रशिया-युक्रेन युद्धावर शांततेच्या मार्गाने तोडगा निघणार?
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन १५ ऑगस्ट २०२५ रोजी अलास्कामध्ये एक महत्त्वाच्या शिखर परिषदेसाठी भेटणार आहेत. त्याचवेळी दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट केली. भारत शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी तयार आहे. युक्रेनसोबतचे संबंध अधिक मजबूत करू, असे आश्वासन नरेंद्र मोदींनी झेलेन्स्की यांना दिले.
अलास्का शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे. मोदींनी युक्रेनप्रती असणारा भारताचा पाठिंबा आणि शांतीप्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनी संयुक्त राष्ट्र महासभेदरम्यान सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष भेट होण्याचा निर्धारही केला. रशिया-युक्रेन युद्ध, द्विपक्षीय सहकार्य आणि जागतिक कूटनीतीवर या दोन नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत युद्ध संपविण्याच्या शक्यतांवरही मोठ्या प्रमाणावर विचार विनिमय झाला.
झेलेन्स्की यांनी मोदींना रशियाच्या हल्ल्यांची भयावह माहिती दिली. जापोरिझ्झियामधील बस स्थानकावर झालेला ताजा हल्ला हा सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यासाठीच केला गेला, असे ते म्हणाले. या हल्ल्यात डझनभर लोक जखमी झाले. झेलेन्स्की यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर दिली. भारत शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध आहे आणि युक्रेनसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मोदी म्हणाले.
युक्रेन-रशिया युद्ध
थांबविण्याचा प्रयत्न
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील देशांवर मोठा टॅरिफ बॉम्ब टाकला आहे तर दुसरीकडे ते अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट घेणार आहेत. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.
