महाराष्ट्र सरकारला मिळाला ताबा, शेलार यांची माहिती
लंडन : वृत्तसंस्था
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनमधून सोमवार, दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली. ही तलवार राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे लंडनमध्ये सुपूर्त करण्यात आली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनख्यानंतर आता मराठा साम्राज्यातील आणखी एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात येणार आहे.
राज्य सरकारने ही तलवार एका मध्यस्थामार्फत जवळपास ४७.१५ लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. १६ ऑगस्टपर्यंत राजे रघुजी भोसलेंची ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे. रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांच्या युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती.
रघुजी भोसले यांनी १७४५ च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारतातसुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता.ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपीय बनावटीचे पाते हे १७००-१८०० च्या काळात प्रसिद्ध होते.
या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. १७१८ मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यावेळी ही तलवार लंडनला नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे.
महाराष्ट्राचा ऐतिहासिक विजय
महाराष्ट्र शासनातर्फे ज्या मध्यस्थाने हा लिलाव जिंकला, त्यांना लंडन येथे प्रत्यक्ष भेटून कायदेशीर बाबी पूर्ण करुन आज आशिष शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली. अशाप्रकारे परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. अनेक पराक्रमांची साक्षीदार असलेली ही ऐतिहासिक तलवार ताब्यात घेण्याचे भाग्य मला लाभले, हा तमाम महाराष्ट्राचा हा एक ऐतिहासिक विजय आहे असे आशिष शेलार म्हणाले.