१९४७ पासून २०२५ - विकासाची अनेक शिखरे पादाक्रांत

yongistan
By - YNG ONLINE

 भारताचा ७९ व्या स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. गेल्या आठ दशकांच्या काळात भारताने प्रत्येक क्षेत्रात अलौकीक कामगिरी केली असून जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत झेप घेतली आहे. शेती, उद्योग आणि अवकाश मोहिमेतही भारताचे स्थान बळकट होत आहे. मात्र आजही काही आव्हाने देशाला विकासापासून मागे खेचण्याचा प्रयत्न करतात किंवा अडथळे आणतात. यावर मात केल्याशिवाय आपल्याला प्राचीन काळातील गौरव प्राप्त करणे कठीण आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाने तन, मनाने स्वातंत्र्याचा आदर करणे आणि कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे.

कधीकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता, असे म्हटले जाते.  ‘जहॉ जहॉ डाल डाल पर सोने की चिडिया करती थी बसेरा, वह भारत देश है मेरा... हे गीत ऐकले तरी अंगावर शहारे येतात. इंग्रजांची जुलमी राजवट उलथून टाकत भारतीय नायकांनी आणि हजारो स्वातंत्र्यवीरांना देशाला गुलामीगिरीतून मुक्त केले. पण ही गुलामी बरी होती, असे काही जण सहजपणे बोलून जातात. हा विचार धोरणकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्य नागरिकांनाही विचार करायला लावणारा आहे.  

कधी संथ तर कधी वेगाने वाटचाल करत तुम्ही-आम्ही सर्वच देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आठ दशकाची वाटचाल हा मोठा टप्पा आहे. १९४७ पासून २०२५ पर्यंतच्या काळात भारताने विकासाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. कृषी  आणि खाद्यान्न क्षेत्रात भारत आत्मनिर्भर झाला असून एकेकाळी भारताला गहुदेखील अमेरिकेतून मागवावा लागत असे. उद्योग क्षेत्रात देखील लघु आणि मध्यम उद्योगाची उभारणीचा टप्पा देशाच्या विकासाला मजबूत आधार देणारा ठरला. तंत्रज्ञानाच्या पातळीवर देखील भारत आघाडी घेत आहे. स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजनांची फलनिष्पत्ती म्हणजे प्रत्येक क्षेत्रात देशाला मजबूत आणि आत्मनिर्भर करण्याचे झालेले काम. स्वातंत्र्यानंतर देशात मोठमोठी धरणे उभारली, वीज प्रकल्प आकारास आले. एकुणातच स्वातंत्र्यानंतर देशाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे.

प्रत्येक घटकाची भूमिका

स्वातंत्र्याच्या लढाईत सर्व समुदायातील, वर्गातील भारतीय नागरिक सहभागी झाले. यात ३३ कोटी भारतीयांचा सामुदायिक सहभाग होता. राजकीय स्वातंत्र्य १९४७ मध्ये मिळाले होते. पण सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतीक क्षेत्रात देशाची प्रगती होईल, तेव्हाच स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त होतो. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नेता, पत्रकार, शेतकरी, मजूर, तरुण, महिला पुरुष यांचे सर्वांचेच योगदान राहिले. त्याचा परिणाम म्हणजे देश स्वतंत्र झाला.  स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या यशाचे आपण साक्षीदार आहोतच, पण एक निरीक्षक प्रत्येक क्षेत्रातील स्वातंत्र्य अपेक्षेप्रमाणे आहे का, याचा सखोलतेने अभ्यास करतो. तो नेता, अभिनेता, विचारवंत, समाजशास्त्रज्ञ आणि अर्थतज्ज्ञ अशा अनेक भूमिकेतून वावरत असतो. हाच व्यक्ती देशाच्या प्रगतीकडे त्रयस्थ भूमिकेतून पाहत असतो. दुष्यंत कुमार यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, इथपर्यंत पोचता पोचता अनेक नद्या अटतात. पाणी कोठे जिरले हे आम्हाला ठाऊक आहे’

काळाच्या ओघात लेखक देखील आपली नैतिकता विसरले. त्यांची लेखणी भांडवलदार आणि शासकाचे गुणगाण करू लागली. परिणामी फाळणीच्या वेदना आणि स्वातंत्र्यासाठी लढला गेलेला १८५७ चा लढा,जलियनवाला बाग हत्याकांड अशी जबर किंमत मोजून मिळवलेल्या स्वातंत्र्याचे फळ चाखण्यासाठी आता स्पर्धा सुरू आहे. देशाची उभारणी करणारे आणि स्वाधीन करणारे पडद्याआड गेले आणि काही स्वार्थी मंडळी त्यांनी पिकवलेली रसाळ फळे खावू लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेला अपेक्षाभंग हा काळानुसार तीव्र होत गेला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या यशाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. स्वातंत्र्यानंतर अज्ञेय यांच्यासारख्या मातब्बर लेखकाने देखील एका लेखात म्हटले, सर्वकाही मिळाले, परंतु ते अर्थहीन होते. शिक्षण मिळाले, परंतु त्याचा पाया आणि सन्मान गमावलेला होता. राष्ट्रीयत्व मिळाले, परंतु त्यांचा अर्थ आणि ऐतिहासिक संदर्भ नाहीसा झाला. स्वातंत्र्यात जन्म झाला, परंतु व्यक्तिमत्त्व मिळाले नाही. त्याअभावी चेहर्‍याला काय अर्थ? तो केवळ मुखवटा असतो. बाळगा आणि उतरवा.


देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या रितीने नागरिक एकटवले ते सर्व धर्म, संप्रदाय, जात, विविध वर्णातील होते.  एवढेच नाही तर भांडवलदार देखील देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटत होते. सर्वाच्या मनात राष्ट्रीय भावना जागरुक झाली होती. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांच्यासारखे नायक दिसत होते.  कालांतराने स्वातंत्र्याचा अर्थ टिकला नाही. आपण धर्म, जात, वर्ण यात अडकत गेलो. आपण दक्षिण-उत्तर भारतात विभागलो गेलो. ज्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले, त्याच स्वातंत्र्याची किंमत वसुल करू लागलो. भारतमातेसाठी यापेक्षा अधिक दुर्देवाची बाब काय असू शकते.

जागतिक शक्ती होण्याचे सामर्थ्य
भारतात अनेक प्रकारची विषमता, आव्हाने असतानाही आपला देश एक शक्तीशाली देश म्हणून नावारुपास येत आहे. कुटनिती पातळीवर भारताचे परराष्ट्र धोरण यशस्वी ठरताना दिसत आहे. भारत अनेक क्षेत्रात आत्मनिर्भर झाला असून एकेकाळी सुई तयार करणे देखील कठीण होते, अशा देशातील माणसं आता अवकाशात संशोधनासाठी जात आहेत. खाद्य, वस्त्र, तंत्रज्ञान, कृषी यात भारताने आघाडी घेतली. अमेरिकेचा दबदबा असलेल्या सिलीकॉन व्हॅलीत भारतीय तज्ज्ञांची मोठी फळी आहे. गेल्या आठ दशकांत भारत आर्थिक महासत्ता म्हणून आकारास येत आहे. लष्करी सामर्थ्य आणि अवकाश संशोधनात सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. एवढेच नाही तर अनेक शतकापासूनची संस्कृती आणि परंपरेचे वाहक असणार्‍या भारतामध्ये विश्वगुरू होण्याचे सामर्थ्य आहे. भारतभूमीत ऋषी, संतांची परंपरा राहिली आहे. अहिंसा, बंधुभावाचे साक्षीदार असलेल्या भूमिने ‘वसुधैव कुटुम्बकम’ची संकल्पना रुजविली. प्रत्येक पातळीवर जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. भारताने वर्णभेदास नाकारले आहे. त्यामुळे भारताला जगात वेगळे स्थान आहे.