भारतीय वस्तूंवर २७ ऑगस्टपासून अमेरिकेचे ५० टक्के टॅरिफ

yongistan
By - YNG ONLINE


नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुस-या टर्ममध्ये वेगळ््या माध्यमातून जगावर अधिराज्य गाजविण्याचा प्रयत्न चालवला आहे. यासाठी त्यांच्याकडून विविध देशांवर टॅरिफ लादण्यात येत आहेत. भारतावर अमेरिकेने ५० टक्के टॅरिफ लादले. आता याची अंमलबजावणी


२७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अमेरिकेने या संदर्भातील नोटिफिकेशन जारी केले. भारताने रशियाकडून तेल खरेदी करून अप्रत्यक्षपणे यूक्रेन विरुद्ध त्यांना सहकार्य केल्याचा अमेरिकेचा दावा आहे. 

अमेरिकेने भारतावर पहिल्यांदा २५ टक्के टॅरिफ लादले होते. ज्याची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली होती. आता २७ ऑगस्ट २०२५ पासून ५० टक्के टॅरिफ लागू करण्यात येईल. यामुळे भारताच्या ७.३ लाख कोटी रुपयांच्या अमेरिकेला होणा-या निर्यातीवर परिणाम होणार आहे. यामध्ये कापड, रत्न, दागिने, सागरी उत्पादन, ऑटो पार्टस यासारख्या उद्योगांवर परिणाम होणार आहे. यावर भारत सरकारने अमेरिकेचे पाऊल अयोग्य आणि अन्यायपूर्ण असल्याचे म्हटले आहे. विदेश मंत्रालयाने भारताने राष्ट्रीय हितासाठी रशियाकडून तेल खरेदी केली आहे. अमेरिकेनेच पहिल्यांदा जागतिक ऊर्जा बाजारातील स्थिरतेसाठी भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. अमेरिकेकडून भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले जात असलं तरी भारत राजनैतिक चर्चा आणि निर्यातदारांना प्रोत्साहन देण्याबाबत योजना राबवत आहे, असेही म्हटले. 

शेअर बाजारात घसरण

अमेरिकेत भारतातून आयात होणा-या वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ उद्या २७ ऑगस्ट २०२५ पासून लागू होत आहे. याचा फटका शेअर बाजाराला बसला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्समध्ये २६ ऑगस्ट रोजी दुपारी ५२४ अंकांची घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स निर्देशांक ८११०३ अंकांवर पोहोचला तर निफ्टी  ५० मध्ये देखील घसरण पाहायला मिळाली. 

...........................................

तेजस फायटर जेटसाठी 

अमेरिका इंजिन पुरविणार

नवी दिल्ली : भारत आपली वायुसेना अधिक सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय घेणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लावल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असला तरी अमेरिकेची कंपनी जनरल इलेक्ट्रिक भारतीय तेजस फायटर जेटसाठी इंजिन पुरवणार आहे. ही अब्जावधी रुपयांची डील सप्टेंबरपर्यंत अंतिम होण्याची शक्यता आहे.

संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार या डीलनुसार जीई कंपनी एलसीए तेजस मार्क-१अ साठी ११३ नवे जीई-४०४ इंजिन भारताला देणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच ९७ नवीन तेजस मार्क-१ अ विमाने खरेदी करण्यास मंजुरी दिली. याआधीच ८३ फाइटर जेटसाठी ९९ इंजिन खरेदीचे करार झाले आहेत.

वायूसेनेला केव्हा मिळणार तेजस?

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या डीलनुसार ८३ विमानांचे इंजिन २०२९-३० पर्यंत पुरवणार आहे. त्यानंतर ९७ विमानांची दुसरी खेप २०३३-३४ पर्यंत भारतीय वायूसेनेला मिळेल.  जीई दरमहा २ इंजिन भारतात पुरवेल. एचएएलने वायुसेनेला पहिले ८३ तेजस २०२९-३० पर्यंत देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.