न्या. पांचोलींच्या नियुक्तीवर आक्षेप

yongistan
By - YNG ONLINE


न्या. नागरत्न यांनी दर्शविली असहमती

नवी दिल्ली : पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल मनुभाई पांचोली यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने सोमवार, दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी केंद्र सरकारला केली. मात्र, हा निर्णय एकमताने घेण्यात आलेला नव्हता. कारण पाच न्यायाधीशांपैकी एक न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न यांनी न्यायमूर्ती पांचोली यांच्या निवडीला विरोध केला असल्याची माहिती मिळत आहे. 

ज्येष्ठता आणि प्रादेशिक प्रतिनिधित्व या पार्श्वभूमीवर न्या. नागरत्न यांनी आक्षेप नोंदविला. उच्च न्यायालयाच्या सेवा ज्येष्ठतेच्या यादीत न्यायमूर्ती पांचोली यांचा सध्या ५७ वा क्रमांक लागत आहे. न्यायमूर्तींची निवड करण्यासाठी नेमलेल्या न्यायवृंदामध्ये (कॉलेजियम) सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याव्यतिरिक्त न्या. सूर्यकांत, न्या. विक्रम नाथ, न्या. जे. के. माहेश्वरी आणि न्या. नागरत्न यांचा समावेश होता. या न्यायवृंदाने न्यायमूर्तीची निवड करताना ३ निकष समोर ठेवले होते. त्यात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीशांची अखिल भारतीय स्तरावरील ज्येष्ठता, प्रतिनिधित्वाचे तत्त्व, योग्यता आणि सचोटी हे निकष पाळले. 


भूतकाळात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी शिफारस करताना या निकषांचा संतुलित विचार केला जात होता. विशेषत: सरन्यायाधीश होऊ शकणा-या उमेदवारांच्या निवडीसाठी ज्येष्ठता हा निकष बाजूला ठेवला जात असे. न्यायमूर्ती नागरत्न यांनी आक्षेप घेतल्यानुसार सर्वोच्च न्यायालयात गुजरात उच्च न्यायालयाचे दोन न्यायाधीश आधीच आहेत. त्यामध्ये जे. बी. पारडीवाला आणि न्या. एन. व्ही.  अंजारिया हे गुजरातच्या न्यायालयातून आले आहेत. पांचोली यांची निवड झाल्यास गुजरात उच्च न्यायालयातून येणारे ते तिसरे न्यायाधीश ठरतील. न्या. पांचोली पाटणा उच्च न्यायालयाचा कार्यभार सांभाळण्यापूर्वी ते गुजरात उच्च न्यायालयात कार्यरत होते, असे म्हणत न्या. नागरत्न यांनी या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एवढेच नव्हे तर अशा प्रकारची पावले उचलल्यास चुकीचे उदाहरण निर्माण केले जाऊ शकते. तसेच न्यायवृंदाच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण होऊ शकते. 

...तर गुजरातमधून 

२ सरन्यायाधीश

न्यायमूर्ती पांचोली यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यास त्यांना सरन्यायाधीशपदी कामकरण्याची संधी मिळू शकते. न्या. पारडीवाला हे २०२८ मध्ये २ वर्षांसाठी आणि न्या. पांचोली हे २०३१ मध्ये ७ महिन्यांसाठई सरन्यायाधीश होऊ शकतात. 

या आधीही होते 

३ गुजरातचे न्यायाधीश

मे महिन्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयात गुजरात उच्च न्यायालयातील न्या. पारडीवाला, एम. आर. शाह आणि बेला त्रिवेदी या ३ न्यायाधीशांचा समावेश होता. शाह मे महिन्यात तर बेला त्रिवेदी यांचा १६ मे हा कामाचा अखेरचा दिवस होता. यांच्याखेरीज मुंबई, अलाहाबाद, पंजाब व हरियाणा या उच्च न्यायालयातूनही प्रत्येकी ३ न्यायाधीशांचा सर्वोच्च न्यायालयात समावेश आहे.