'टोकियो : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २८ आगस्ट २०२५ रोजी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात शुक्रवार, दि. २९ आगस्ट रोजी जपानसोबत १३ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान-५ मोहिमेबाबत महत्वाची माहिती दिली. या मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (जॅक्सा) या संस्था एकत्र काम करणार असल्याचे मोदींनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो येथे जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर मोदींनी भारत आणि जपान यांच्यातील अंतराळ संस्थांच्या युतीची घोषणा केली. पंतप्रधान म्हणाले की, चांद्रयान-५ मोहिमेसाठी इस्रो आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (जॅक्सा) हे एकत्र काम करणार आहे. मी या पार्टनरशीपचे स्वागत करतो. आमच्यातील युती आता पृथ्वीच्या सीमा ओलांडून जाणार आहे आणि ती अवकाशात मानवजातीच्या प्रगतीचे प्रतीक बनेल.
आम्ही पुढील दशकासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. आज आमच्यात झालेली चर्चा खूप महत्वाची होती. जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आणि चैतन्यशील लोकशाही म्हणून आमची पार्टनरशीप केवळ दोन्ही देशांसाठीच नव्हे तर जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी महत्त्वाची आहे.
दहशतवाद आणि सायबर सुरक्षेबाबत भारत आणि जपानने चिंता व्यक्त केली. संरक्षण आणि सागरी सुरक्षेला प्रोत्साहन देण्यात दोन्ही बाजूंकडून समान प्रयत्न केले जात आहेत. भारत-जपान पार्टनरशीप परस्पर विश्वासावर आधारित आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी पुढच्या पिढीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या ताकदीचा वापर करणे आवश्यक असल्याचे विधान केले.
जपान भारतात १० ट्रिलियन
येनची गुंतवणूक करणार
आज दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार झाले. यानंतर माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पुढील १० वर्षांत जपानकडून भारतात १० ट्रिलियन येनची गुंतवणूक केली जाणार आहे. जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी भारत-जपान सहकार्य महत्त्वाचे आहे. गुंतवणूक, नवोपक्रमासह अनेक क्षेत्रात सहकार्यासाठी आम्ही १० वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे.
