हॉकीचा जादूगार म्हणून ओळख असलेले मेजर ध्यानचंद यांचा जन्म ९ ऑगस्ट १९०५ मध्ये झाला. मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरी केली जाते. हा दिवस संपूर्ण खेळाडूंसाठी सुवर्ण दिवस आहे. मेजर ध्यानचंद हे कर्तबगार, जिद्दी आणि चिकाटी वृत्तीचे महान खेळाडू होते. मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीत १९२८, १९३२, १९३६ अशाप्रकारे ३ वेळा गोल्डन कामगिरी बजावून देशाची शान वाढवली. यातून ते संपूर्ण जगात हॉकीचे जादूगार म्हणून प्रसिद्ध झाले.
आज आपल्या देशात राष्ट्रीय खेळांचा जो बोलबाला दिसतो, त्याचे संपूर्ण श्रेय मेजर ध्यानचंद यांना जाते. हॉकीसोबतच कबड्डी, भालाफेक, थाळी फेक, खो-खोसह अशा अनेक राष्ट्रीय खेळांना मोठे स्थान मिळाले आहे. देशात खासदार क्रीडा महोत्सव किंवा इतर माध्यमातून खेळांना महत्त्व देऊन खेळाडूंमध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली जाते. राष्ट्रीय खेळांना सकारात्मक भूमिका देण्याचे श्रेय मेजर ध्यानचंद यांना जाते. आज देशातील महत्त्वपूर्ण राष्ट्रीय खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत. कबड्डी हा राष्ट्रीय खेळ होता आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचला आहे ही भारतासाठी गौरवास्पद बाब आहे.
कॉमनवेल्थ गेम, ऑलिम्पिक खेळ, पॅराऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय खेळ मोठ्या प्रमाणात दिसून येतात व राष्ट्रीय खेळांमुळेच आपण आज जगात आपली आगळीवेगळी छाप सोडली आहे. १९३५ साली विश्वविख्यात क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन मेजर ध्यानचंद यांना भेटले. त्यांनी त्यांच्या हॉकीतील चेंडू वल्हवण्याचे सामर्थ्य पाहून कौतुक केले. १९३६ साली बर्लिन येथे जर्मनीचा हुकूमशाह एडॉल्फ हिटलर हा हॉकीचा अंतिम सामना पाहात होता. जर्मनी विरुद्ध भारत असा सामना होता. भारताने जर्मनीचा ८ विरुद्ध
१ गोलनी दणदणीत पराभव केला. हा खेळ पाहून हिटलर आश्चर्य चकित झाले. खेळ संपल्यानंतर हिटलरने मेजर ध्यानचंद यांना भेटीचे निमंत्रण दिले. या भेटीमध्ये त्यांच्या खेळण्याची जादू पाहून जर्मन सैन्यात मोठे पद देण्याचे कबुल केले; परंतु मेजर ध्यानचंद यांनी हिटलरची ऑफर नाकारली. १९२८ ते १९६४ हे युग भारतीय हॉकीसाठी सुवर्णयुग मानले जाते. कारण या काळात ८ ऑलिम्पिकमध्ये ७ सुवर्ण पदक मिळवले होते.