भारतीय उत्पादने ५० टक्क्यांनी महागणार, चीन, बांगलादेशी, व्हिएतनामच्या वस्तूंना पसंती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लावला असून त्याची अमलबजावणी २७ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. त्यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकेत ५० टक्क्यांनी महागणार आहेत. त्यामुळे भारतीय निर्यातीवर खूप मोठा परिणाम होणार आहे. दुसरीकडे भारतीय वस्तू महाग झाल्यानंतर अमेरिकन ग्राहक खरेदीसाठी चीन, व्हिएतनाम आणि बांगलादेशी वस्तूंना पसंती देतील. त्यामुळे भारताला फार मोठा धक्का बसू शकतो.
सीटीआयचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांच्या मते, भारताच्या व्यापारावर खोल परिणाम होणार आहे. तसेच लाखो नोकऱ्या अडचणीत येण्याची शक्यता आहेत. इतकेच काय तर काही क्षेत्रांचे मोठे नुकसान होऊ शकते. अमेरिकेच्या टॅरिफमुळे कापड, चामडे, रत्ने-दागिने, ऑटो पार्ट्स, केमिकल, फार्मा, सीफूड आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रावर परिणाम होणार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या १० लाख नोकऱ्या अडचणीत येणार आहेत.
४८ अब्ज अमेरिकन
डॉलर्सच्या निर्यातीला फटका
सीटीआयच्या अंदाजानुसार, अमेरिकेच्या टॅरिफ नितीमुळे भारताचे ४८ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीवर थेट परिणाम होईल. दुसरीकडे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. टॅरिफ नेमका कोणत्या कंपन्यांना लागू होईल.. ज्यांनी आधीच ऑर्डर घेतल्या आहेत त्यांना की आधीच जो माल मार्गावर आहे त्याला? याबाबत अमेरिकेने स्पष्ट असे काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी भारताने १.२५ लाख कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि ९२ हजार कोटींची औषधे पाठवली होती. यापू्र्वी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ०.४१ टक्के आणि औषधांवर शून्य टक्के शुल्क होते. मात्र या वस्तू आता ५० टक्क्यांनी महागणार आहेत.
अमेरिकन वस्तूंवर कर वाढवा,
जशास तसे उत्तर द्या
भारत सरकार या स्थितीचा सामना कसा करणार याकडे आता लक्ष लागून आहे. दुसरीकडे, अमेरिकेतून येणारी मौल्यवान रत्ने, अणुभट्टीचे भाग, विमान उपकरणे, विद्युत वस्तू, प्लास्टिक, सुखा मेवा, स्टील या सारख्या वस्तूंवर तितकाच टॅरिफ लावावा. बृजेश गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे की, भारताने अमेरिकेला जसाच तसं उत्तर दिलं पाहीजे. अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करावं आणि जर्मनी, ब्रिटेन, सिंगापूर, मलेशिया या सारख्या देशात बाजारपेठा शोधाव्यात, असा सल्ला गोयल यांनी दिला.