कंपन्यांचा नोकर कपातीचा धडाका

yongistan
By - YNG ONLINE

 


२०२३ मध्ये २.६२ लाख तांत्रिक व्यावसायिकांनी गमावली नोकरी


देशातील सर्वात मोठी आयटी संस्था टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) ऑगस्ट २०२५ मध्ये आपल्या एकूण कर्मचारी संख्येपैकी सुमारे २ टक्के म्हणजे जवळपास १२ हजार कर्मचा-यांना कमी करण्याची घोषणा केली. ही कामगार कपातीची पहिली घटना नाही. २०२३ मध्येही इन्फोसिस, विप्रो, टीसीएस आणि टेक महिंद्रा यासारख्या प्रमुख कंपन्यांनी नवे भरती आदेश थांबवून आणि कामगार कपात करून ६७ हजारांहून अधिक नोक-या कमी केल्या होत्या. त्यातच चॅटजीपीटी, जेमिनी आणि डीपसीक यांसारख्या जनरेटिव्ह एआय साधनांच्या वापरामुळे प्रोग्रामिंग, टेस्टिंग आणि सपोर्ट यासारखी अनेक कामे स्वयंचलित झाली आहेत. त्याचाही फटका भविष्यात सहन करावा लागू शकतो.

एलटीआय माइंडट्रीसारख्या अनेक मध्यम आकाराच्या आयटी कंपन्यांनीदेखील हजारो कर्मचा-यांना बाहेरचा रस्ता दाखवला. एकट्या २०२३ मध्ये अंदाजे २.६२ लाख तांत्रिक व्यावसायिकांची नोकरी गेली. आयबीएम, सिस्को, एसएपी, इंटेल, टिटर (एक्स) आणि असंख्य स्टार्टअप्सनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर कपात केली. २०२३ मध्ये एका महिन्यातच एक लाखांहून अधिक नोक-या संपुष्टात आल्या होत्या. या वर्षी जूनपर्यंत जगभरातील आयटी क्षेत्रात ८० हजारांहून अधिक लोक बेरोजगार झाले.

भारताचे आयटी क्षेत्र आज ५५ लाखांहून अधिक लोकांना रोजगार देते आणि जीडीपीत ७-८ टक्के योगदान करतो. विशेषत: भारतातील कामगार कपातीचे प्रमाण अमेरिका-युरोपच्या तुलनेत कमी आहे. सिलिकॉन व्हॅलीप्रमाणे २५ ते ५० टक्के कपात करण्याऐवजी भारतीय कंपन्या भरती थांबवणे, ऑफर रोखून धरणे आणि कामगिरीआधारित निर्गमन असे तुलनेने सौम्य मार्ग अवलंबतात. याचा सर्वाधिक फटका मध्यम व वरिष्ठ स्तरावरील कर्मचा-यांना बसला आहे. एंट्री लेव्हल नोक-या तुलनेने सुरक्षित राहिल्या तरी कॅम्पस हायरिंग मंदावली आहे. अमेरिकेत २०२२ च्या शेवटापासून आतापर्यंत ८० हजारांहून अधिक भारतीय आयटी व्यावसायिक बेरोजगार होऊन भारतात परतले. यामुळे स्थानिक नोकरी बाजारावर अतिरिक्त दबाव आला. 

आयटी उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा दीर्घकाळाचा स्तंभ राहिला आहे. चांगले वेतन घेणारे आयटी व्यावसायिक बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि गुरूग्रामसारख्या शहरांचे आर्थिक हृदय मानले जातात. जर कामगार कपातीचा हा टप्पा लांबला तर या शहरांच्या रिअल इस्टेट बाजारात मंदी येऊ शकते. वाहन व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी कमी होऊ शकते आणि रिटेल व हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला तोटा सोसावा लागू शकतो. या संकटावर मात करण्यासाठी आयटी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात क्लाऊड, एआय/एमएल, डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटीसारख्या क्षेत्रांमध्ये नवे कौशल्य आत्मसात करत आहेत. काही आयटी सेवा पुरवठादार पुनरावृत्तीने विकता येणारे सॉफ्टवेअर, उपकरणे, प्लॅटफॉर्म्स यासारखी स्वत:ची बौद्धिक संपदा निर्माण करून महसूल व रोजगाराचे नवे स्रोत तयार करत आहेत.