स्कूल व्हॅन परवाने वाटप आता खुले

yongistan
By - YNG ONLINE

 


शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी निर्णय

मुंबई : प्रतिनिधी

शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणा-या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी पावले टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत. याबाबतची अधिसूचना  जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. 

मंत्री सरनाईक म्हणाले की, अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. परिवहन विभागाने बोलावलेल्या पालक आणि बस संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनधिकृत वाहनांतून विद्यार्थी वाहतूक होत असल्याचा मुद्दा गाजला होता. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्ययावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४) तयार केली आहे. चारचाकी १२+१  आसनापर्यंत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. सदर वाहने   बीएस-व्हीआय या श्रेणीतील असणार आहेत. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचाही समावेश केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.