अॅपचे नाव छावा राईड, बुकिंगची संधी, एसटी प्रवास होणार स्मार्ट
मुंबई : प्रतिनिधी
ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या खाजगी वाहतूक सेवांप्रमाणे आता महाराष्ट्र सरकार स्वत:चे ऍप विकसित करणार आहे. हे अॅप छावा राईड या नावाने विकसित केले जाणार आहे. विशेष म्हणजे हे अॅप एसटी महामंडळामार्फत चालवले जाणार असून परिवहन खात्याच्या अलीकडील बैठकीत या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या नव्या अॅपमुळे एसटी प्रवास अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर होणार असल्याचा दावा करण्यात आला.
मंत्रालयात आयोजित केंद्र व राज्य शासनाच्या प्रवासी वाहतुकीविषयी अॅग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) अधीन राहून राज्य शासनाचे ‘यात्री अॅप’ बनवण्याच्या अंतिम मसुद्यावरील बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
एसटी महामंडळाच्या या अॅपमुळे एसटी बसमधील प्रवाशांना घरबसल्या बुकिंग, बस लोकेशन ट्रॅकिंग, वेळापत्रक माहिती आणि कस्टमर सपोर्टसारख्या सुविधा एका क्लिकवर मिळणार आहेत. या माध्यमातून एसटीची सेवा अधिक प्रवासी-केंद्रित होणार असून महामंडळाचे उत्पन्नही वाढवण्याचा सरकारचा हेतू आहे. यासोबतच भरमसाठ नफा कमावून प्रवासी व चालकांना वेठीस धरणा-या खासगी कंपन्यांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या प्रामाणिक हेतूने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी ऍप सुरू करण्यात येणार आहे, असेही सरनाईक म्हणाले.
नवीन शासकीय अॅपला छावा राईड अॅप हे नाव द्यावे, असे सर्वानुमते ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने हे अॅप लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सरनाईक यांनी सांगितले. एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणा-या राज्य शासनाच्या अधिकृत अॅपद्वारे रोजगाराची संधी मिळणा-या मराठी तरुण-तरुणींना मुंबै बँकेच्या माध्यमातून विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येईल, असे आश्वासन बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले असल्याचे ते म्हणाले.
महामंडळ तोट्यात
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे संचयी नुकसान तब्बल १०,००० कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. गेल्या ५ वर्षांत या नुकसानीत १२४ टक्क्यांची वाढ झाल्याचे श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. या अहवालातील माहितीनुसार गेल्या ४५ आर्थिक वर्षांपैकी फक्त ८ वर्षांत महामंडळाला नफा झाला. उर्वरित काळात महामंडळाने सातत्याने तोटा सहन केला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.