ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफबॉम्ब

yongistan
By - YNG ONLINE



भारतावर आणखी २५ टक्के अतिरिक्त कर, आता ५० टक्के कराचा बोजा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा दणका दिला आहे. अमेरिकेने बुधवार, दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी भारतावर २५ टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली. अमेरिकेने हा निर्णय घेताना भारताने रशियन तेलाची सतत खरेदी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे म्हटले आणि याविरोधात बोलाल तर आणखी कर लादला जाईल, असा थेट इशारा ट्रम्प यांनी भारताला दिला. याआधी अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला होता. त्यामुळे आता अमेरिकेचा एकूण कर ५० टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे ही भारतासाठी चिंतेची बाब बनली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला अतिरिक्त कर २१ दिवसांच्या आत लागू होणार आहे. म्हणजेच २७ ऑगस्ट २०२५ पासून हा कर लागू होणार आहे. मात्र, या तारखेपूर्वी निघून १७ सप्टेंबर २०२५ पूर्वी अमेरिकेत पोहोचलेल्या वस्तूंवर हा कर आकारला जाणार नाही. विशेष म्हणजे हा कर इतर सर्व शुल्क आणि करांव्यतिरिक्त असणार आहे. मात्र काही विशेष प्रकरणांमध्ये यात सूट दिली जाण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी २४ तासांपूर्वीच भारतावर कर वाढवण्याची धमकी दिली होती. एका मुलाखतीत ट्रम्प यांनी जर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर कर आणखी वाढवला जाईल. आता ट्रम्प ते औषध आयातीवरील कर २५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. जो आतापर्यंतचा सर्वात मोठा कर असू शकतो. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या आधी अमेरिकेने २९ जुलै रोजी भारतावर २५ टक्के कर लावल्याची घोषणा केली होती. ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध तितकेसे चांगले नाहीत, असेही विधान केले होते. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. आता आणखी कर वाढल्याने भारताची अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता आहे.