वायूसेना प्रमुखांनी दिली माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय वायुसेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानच्या ५ लढाऊ विमानांसह एका मोठ्या विमानाचा नाश केल्याची माहिती वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी दिली. हा हल्ला पाकिस्तानच्या हद्दीत तब्बल ३०० किलोमीटर अंतरावरून करण्यात आला. जमिनीपासून ते आकाशात करण्यात आलेला हा हल्ला म्हणजे भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम ठरल्याचे त्यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचे नेमके किती नुकसान केले, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. त्यावर खुद्द वायूसेना प्रमुखांनीच आज उत्तर दिले.
बेंगळुरुतील एअर चीफ मार्शल एल. एम. कात्रे मेमोरियल लेक्चरच्या १६ व्या सत्राला संबोधित करताना अमरप्रीत सिंह यांनी पाकिस्तानला दिलेल्या या मोठ्या धक्क्याची माहिती दिली. विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे पाकिस्तानातील एडब्ल्यूसी हँगरवर हल्ला करण्यात आला. या हँगरमध्ये देखभालीसाठी ठेवलेली एफ-१६ लढाऊ विमाने तसेच एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम होते, असेही ते म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानच्या हवाई क्षमतेला मोठा धक्का बसला असून, तज्ज्ञांच्या मते हा भारताच्या वायुसेनेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा हल्ला ठरला आहे.
हल्ल्याचा निर्णय अचूक,
मुख्य इमारतीवरही हल्ला
हवाई क्षेत्रावरील हल्ल्याचा निर्णय अत्यंत अचूक गुप्त माहितीनुसार घेतला गेला. मुख्य इमारतीवरही हल्ला करण्यात आला, जी काही वेळा नागरी टर्मिनल म्हणूनही वापरली जात होती. आम्ही लहानपणापासून अशा दिवसांची स्वप्ने पाहिली होती. निवृत्तीपूर्वीच मला हे साध्य करण्याची संधी मिळाली.