विशाखापट्टणम : वृत्तसंस्था
जीएसटीमध्ये बदल झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे मानले जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीमधील बदलांमुळे सामान्य लोकांच्या खिशात २ लाख कोटी रुपये येणार आहेत. अर्थात, जीएसटीचे स्लॅब कमी केल्याने सामान्यांच्या खर्चाची बचत होणार आहे. त्यामुळे आता लोकांना त्यांच्या इच्छेनुसार जास्त खर्च करता येणार आहे.
विशाखापट्टणममध्ये आयोजित नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म्स या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ९९ टक्के वस्तूंवर १२ टक्के महसूल मिळतो. त्यावर आता ५ टक्के जीएसटी लागणार आहे. यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना खूप फायदा होणार आहे. निर्मला सीतारामन यांच्या मते जीएसटी कौन्सिलचा हा निर्णय ग्राहकांवरील कराचा भार कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेत पैशाची उपलब्धता वाढविण्यासाठी आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशातील वेगवेगळ््या उद्योगधंद्यांना जे फायदे मिळतील, ते या नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म्समुळे जनतेसाठी १० पट जास्त असतील. याचा अर्थ जीएसटीमधील बदलामुळे उद्योगधंद्यांबरोबरच सामान्य लोकांनाही खूप फायदा होणार आहे. जीएसटीमधून मिळणारे उत्पन्न २०१९ मध्ये ७.१९ लाख कोटी रुपये होते. ते आता २०२५ मध्ये २२.०८ लाख कोटी रुपये झाले आहे. तसेच कर भरणा-या लोकांची संख्या ६५ लाखांवरून १.५१ कोटी झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून जीएसटी रिफॉर्म्सबद्दल माहिती दिली होती. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर जीएसटी कौन्सिलने जीएसटी २.० ला नुकतीच मंजुरी दिली. यात टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले. आता रोजच्या वापरात येणा-या वस्तूंवर ५ टक्के आणि बाकी सगळ््या वस्तूंवर १८ टक्के टॅक्स लागेल. याआधी १२ टक्के आणि २८ टक्क्यांचे स्लॅब होते. ते आता काढून टाकले आहेत. जीएसटीचे नवे दर २२ सप्टेंबरपासून लागू होतील.