उत्पन्नाचा दाखला आता एकदाच

yongistan
By - YNG ONLINE


विद्यार्थ्यांना दिलासा, एकाच दाखल्यावर शिष्यवृत्ती मिळणार

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत शिष्यवृत्तीसाठी वारंवार उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रे दाखल करण्याची कटकट दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता महाडीबीटी पोर्टलवर एकदाच अपलोड केलेली माहिती ग्रा  धरण्यात येणार असून ऑटो सिस्टीमद्वारे शिष्यवृत्ती वेळेत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवार, दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी सांगितले. 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आणि तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी एकदाच उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करतात. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन व ऑफलाइन पडताळणी करून केली जाते. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीसाठी पुन्हा तीच माहिती मागवू नये, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आणि इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, यावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारच्या हिस्स्याची ६० टक्के रक्कम वेळेत जमा व्हावी यासाठी विशेष कार्यप्रणाली तयार करण्याचेही निर्देश देण्यात आले. शिष्यवृत्तीसाठी एकदा  विद्यार्थ्यांकडून माहिती अपलोड केली, तर नव्याने माहिती घेण्याची आवश्यकता नाही, यासाठी संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया 

अधिक होणार सुलभ

महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी एकदाच कागदपत्रे अपलोड केली तर वारंवार तीच माहिती देण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच विद्यापीठांनाही पुन्हा कागदपत्रे तपासण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे वेळेची बचत होईल आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लवकर मिळेल, असे सांगण्यात आले.