मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी आणि शेतक-यांच्या हितासाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते असे नवीन योजनेची घोषणा दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आली आहे. त्याबरोबरच विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून या रस्त्यांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात यावा, तसेच यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्यासह समितीतील खासदार आणि आमदार उपस्थित होते. सर्वसामान्य शेतक-यांच्या आयुष्यात क्रांंती घडविणारी ही योजना आहे. शेतक-याच्या शेतापर्यंत रस्ते, वीज आणि पाणी पोहोचले तर त्याला आपला माल बाजारपेठेत घेऊन जाणे शक्य होणार आहे. यासाठी सरकारने प्राधान्याने या योजनेवर भर दिला असून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. यासाठी प्रथमत: सीमांकन करणे आवश्यक असूून सर्व आमदारांनी याबाबत अतिदक्ष राहून सर्व पाणंद रस्ते नकाशावर आणावेत. हा नकाशा पुढील महिनाभरात गावात प्रसिद्ध करण्यात यावा. विविध १३ योजनांच्या माध्यमातून सध्या या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आमदारांच्या अध्यक्षतेखाली
मतदारसंघनिहाय समिती
शेतरस्ता योजनेच्या कामकाजासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघनिहाय एक समिती स्थापन केली जाईल. समितीत प्रांताधिकारी सदस्य सचिव तर तहसीलदार, गटविकास अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी काम करतील, असे सांगण्यात आले.