सी. पी. राधाकृष्णन देशाचे १७ वे उपराष्ट्रपती

yongistan
By - YNG ONLINE



बी. सुदर्शन रेड्डींचा पराभव, इंडिया आघाडीची १४ मते फुटली?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३०० मते मिळाली. आज ७८१ पैकी ७६७ खासदारांनी मतदान केले. यातील १५ मते अवैध ठरली तर ७५२ मते वैध होती. यात राधाकृष्णन यांनी १५२ मतांनी विजय मिळविला. विरोधी उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. त्यामुळे ऐनवेळी इंडिया आघाडीची जवळपास १४ मते फुटली असल्याचे समोर आले. ९ सप्टेंबर २०२५ रोजी संसद भवनातील वसुधा कक्षात मतदान प्रक्रिया पार पडली.

सी. पी. राधाकृष्णन आता भारताचे १७ वे उपराष्ट्रपती असणार आहेत. निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास इंडिया आघाडीतून क्रॉस वोटिंग झाले असल्याचे समोर आले आहे. एनडीएकडे एकूण ४२७ खासदार होते. मात्र, जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसच्या ११ खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केले. त्यामुळे हा आकडा ४३८ पर्यंत पोहोचतो. मात्र, सी. पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची एकूण ४५२ मते मिळाली. याचा अर्थ १४ विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराला मते दिली. बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३१४ मते मिळायला हवी होती. मात्र, त्यांना ३०० मतांवर समाधान मानावे लागले.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपराष्ट्रपदीपदाची आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांनी मतदान केल्यानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. यात सी. पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३०० मते मिळाली. या निवडणुकीत बहुमत नसतानाही इंडिया आघाडीने आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. ही फक्त विजयाची नव्हे तर विचारधारेची लढाई आहे, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती. 

भाजपने नेहमीच्या धक्कातंत्राचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल असलेल्या सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिल्यानंतर इंडिया आघाडीने या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे भाजप नेत्यांचे म्हणणे होते. परंतु इंडिया आघाडीने पाठिंबा न देता निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना मैदानात उतरवले. त्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट दाखवत रेड्डी यांच्या मागे बळ उभा केले. विशेष म्हणजे या निमित्ताने इंडिया आघाडीत पुन्हा एकदा एकजूट पाहायला मिळाली. परंतु काही जणांनी गद्दारी केली. परंतु फुटलेली मते नेमकी कोणाची, याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा, राज्यसभेचे मिळून ७८८ सदस्य मतदान करतात. परंतु सध्या ७ जागा रिक्त आहेत. त्यात राज्यसभेच्या ६ आणि लोकसभेच्या एका जागेचा समावेश आहे. 

१३ खासदार तटस्थ

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत १५ मते अवैध ठरली. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ११ मते अवैध ठरली होती. दरम्यान, या निवडणुकीत १३ खासदारांनी मतदान केले नाही. मतदान न करणा-यांमध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचे १ आणि अपक्ष १ अशा खासदारांचा समावेश होता.


खासदार, प्रदेशाध्यक्ष, 

राज्यपाल ते उपराष्ट्रपती 

सी. पी. राधाकृष्णन यांची झारखंडनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. माजी राज्यपाल रमेश बैस यांच्याजागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्रातून ते थेट उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. सी. पी. राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. लहान वयातच ते भारतीय जनसंघाचे सदस्य झाले होते. ते २ वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.


वैचारिक लढाई सुरूच राहणार 

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा जो निकाल लागला आहे तो विनम्रपणे आणि महान गणराज्याच्या लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवत स्वीकारत आहे. निकाल माझ्या बाजूने आलेला नसला तरी मोठ्या उद्देशासाठी सामुदायिकपणे लढत राहू. वैचारिक संघर्ष ताकदीने सुरूच राहील, असे उपराष्ट्रपतीपदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी म्हणाले. यावेळी त्यांनी नवे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांना शुभेच्छा दिल्या.