सत्तापालट, पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचा राजीनामा
काठमांडू : वृत्तसंस्था
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी विरोधात जेन-झेडने केलेल्या आंदोलनामुळे देशातील सत्तेला हादरे बसले. सोशल मीडियावर बंदी घातल्याने जेन-झेडने सरकारविरोधात आंदोलन सुरू केले. दुस-या दिवशीही आंदोलनाची धग कायम होती. संतप्त आंदोलकांनी थेट संसदेत घुसून जाळपोळ, तोडफोड के
ली. मंत्र्यांची सरकारी निवासस्थाने, नेत्यांच्या घरांवर हल्ले करून आग लावली. या आगीत माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा मृत्यू झाला. तसेच अर्थमंत्र्यांनाही लाथा घातल्या. नेपाळ पेटल्याने अखेर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना पायउतार व्हावे लागले. देशात मोठी राजकीय उलथापालथ झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्याने जेन-झेडने सोमवार, दि. ८ सप्टेंबर २०२५ पासून आंदोलन सुरू केले. दुस-या दिवशी आंदोलकांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्र्यांचे बंगले आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांना पेटवले. सेना आणि पोलिसांच्या हातातून आंदोलकांनी शस्त्र हिसकावून घेतली. आंदोलनाचा भडका उडाल्याने अनेक नेते परांगदा झाले. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी राजीनामा दिला. नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक आणि कृषिमंत्री रामनाथ अधिकारी यांच्यासह अनेक मंत्र्यांनीही राजीनामे दिले. अनेक मंत्री लष्कराच्या हेलीकॉप्टरने काठमांडू सोडून पळाले. निदर्शकांनी अनेक मंत्र्यांसह राष्ट्रपतीचे निवासस्थान जाळून टाकले. कर्फ्यूनंतरही तोडफोड, जाळपोळ सुरूच आहे. रस्त्यांवर तरुणांचे तांडेच्या तांडे फिरत आहेत. रस्ते तरुणांनी भरले आहेत. पार्लमेंट इमारतीजवळ निदर्शने सुरु आहेत. दरम्यान, महोत्तरी येथील जलेश्वर जेलची भिंत पाडल्याने त्यातील एकूण ५७२ कैदी फरार झाले.
नेपाळमध्ये जेन-झेड आंदोलन करत असले तरी हे आंदोलन दोन तरुणांनी भडकावले. यामध्ये काठमांडूचे महापौर बालेन शाह आणि सुदन गुरुंग यांचा समावेश आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा यांच्या सरकारने सोशल मीडियावर बंदी घालताच ३६ वर्षांचा तरुण सुदन गुरुंग याने जेन-झेडला आंदोलन करण्यासाठी प्रोत्साहन देणा-या पोस्ट केल्या. ओली सरकारमधील भ्रष्टाचार, घराणेशाही, काही व्यक्तींची वाढती संपत्ती याविरोधात सुदन गुरुंग आवाज उठवत होता. त्यामुळे सत्ता परिवर्तनासाठी त्याने पोस्ट लिहिली. त्यातच ७ सप्टेंबरला जेन-झेडचा वापर करत बालेन शाह यांनीही जेन-झेडच्या रॅलीची घोषणा केली. महापौर बालेन शाह ३५ वर्षांचे आहेत. त्यांनी रॅलीत सहभागी न होता आंदोलनाची दिशा ठरवली. लाखो तरुण रस्त्यावर उतरले. त्यानंतर सुदन गुरुंग यांनी पोस्ट करताच आंदोलनाचा भडका उडाला. ८ सप्टेंबरला लाखो आंदोलक रस्त्यावर उतरले. ज्यांनी राष्ट्रपती भवनावर, पंतप्रधान निवासस्थानावर दगडफेक केली. संपूर्ण नेपाळ पेटल्याने पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. आता शर्मा ओली सुरक्षित ठिकाणी रवाना झाले आहेत.
माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जीवंत जाळले
आंदोलकांनी माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या पत्नीला जिवंत जाळले. जळालेल्या अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आंदोलकांनी खनाल यांच्या घरावर हल्ला केला आणि घराला आग लावली. यावेळी खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकार या घरातच होत्या. या आगीत त्या गंभीर भाजल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला.
अर्थमंत्र्यांना लाथा घातल्या
नेपाळचे अर्थमंत्री विष्णुप्रसाद पोडैल यांना मारण्यासाठी आलेल्या झुंडीने त्यांना रस्त्यावर पिटाळून मारले. पोडैल यांना जमावाने घेरले आहे, मात्र ते कसेबसे सुटून धावताना दिसत आहेत. तेवढ्यात रस्त्यावर असलेल्या एका आंदोलकाने त्यांना लाथ मारली आणि ते खाली कोसळले.
नेत्यांच्या निवासस्थानावर हल्ला
आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या खाजगी निवासस्थानांवर हल्ला केला. ओली यांच्या राजीनाम्याच्या काही तास आधी आंदोलनकर्त्यांनी बालकोट येथील त्यांच्या खासगी निवासस्थानाला आग लावली. तसेच माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल, माहिती व प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग, माजी गृह मंत्री रमेश लेखक आदींच्या घरांवर हल्ले केले.
दिल्ली ते काठमांडू विमानसेवा बंद
भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये मोठी राजकीय उलाथापालथ झाली असून पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशात आंदोलन पेटल्याने तेथील स्थिती पूर्वपदावर येईपर्यंत कुणीही नेपाळचा प्रवास करू नये, असे भारताच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच दिल्ली ते काठमांडू विमानसेवाही बंद केली आहे.
नेपाळची सत्ता आता लष्कराच्या हातात
नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका उडाल्याने बुधवारी नेपाळचे लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल यांनी जनतेशी संवाद साधला आणि राष्ट्रीय एकता आणि नेपाळी लोकांच्या सुरक्षेसाठी लष्कर वचनबद्ध आहे. त्यांनी रात्री १० वाजल्यापासून देशात लष्करी राजवट लागू करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता नेपाळची सत्ता लष्कराच्या हातात गेली.
नेपाळची लोकसंख्या २.९७ कोटी
२०२१ च्या जनगणेनुसार नेपाळची लोकसंख्या २.९७ कोटी एवढी आहे. एकूण लोकसंख्येच्या ८१.१९ टक्के हिंदू आहेत. हिंदूंची लोकसंख्या २ कोटी ३६ लाख एवढी आहे. २०११ च्या तुलनेत हिंदू लोकसंख्येत अल्प घट झाली. एकेकाळी नेपाळ जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. आता हा धर्मनिरपेक्ष देश बनला. मुस्लिम हा तिस-या क्रमांकाचा धर्म आहे. २०२१ च्या जनगणनेनुसार ५.०९ टक्के मुस्लिम आहेत. एकूण संख्या १४ लाख ८३ हजार एवढी आहे. २०११ च्या तुलनेत मुस्लिम संख्या ०.६९ टक्क्यांनी वाढली. नेपाळमध्ये बहुतेक सुन्नी मुस्लिम आहेत. ते भारताच्या सीमेला लागून असलेल्या तराई प्रदेशात स्थायिक आहेत. बौद्ध धर्म दुस-या क्रमांकावर आहे. येथे ८.२ टक्के लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. त्यांची लोकसंख्या २३ लाख ९४ हजार एवढी आहे. तसेच मूळ आदिवासी (किरात धर्म), ख्रिश्चनही आहेत. मात्र, ख-या अर्थाने नेपाळ हिंदूबहुल देश आहे.