प्रसिद्ध अंपायर डिकी बर्ड यांचे निधन

yongistan
By - YNG ONLINE


लंडन : वृत्तसंस्था 

क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध अंपायरांपैकी एक अशी ओळख असलेल्या डिकी बर्ड यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. इंग्लंडच्या यॉर्कशर क्लबने त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. डिकी बर्ड यांनी तब्बल ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केले. त्यांच्या निधनावर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही शोक व्यक्त केला.

सलग तीन वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यांमध्ये अंपायरिंग करणारे डिकी बर्ड हे पहिले अंपायर होते. १९७५, १९७९ आणि १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी अंपायर म्हणून काम केले. १९८३ च्या अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता, त्याचे साक्षीदारही डिकी बर्ड ठरले होते.

डिकी बर्ड यांचा जन्म १९ एप्रिल १९३३ रोजी इंग्लंडच्या बार्न्सले येथे झाला. सुरुवातीला ते फर्स्ट क्लास क्रिकेटर होते, पण क्रिकेटपटू म्हणून त्यांना मोठे यश मिळाले नाही. यॉर्कशर आणि लेस्टरशरकडून खेळूनही फक्त ३,३१४ धावा करण्यापर्यंत त्यांची कारकीर्द मर्यादित राहिली. परिणामी त्यांनी ३२ व्या वर्षी क्रिकेटला अलविदा केले.


 अंपायरिंगमुळे बदलले आयुष्य

क्रिकेट सोडल्यानंतर बर्ड यांनी आपला मोर्चा अंपायरिंगकडे वळवला आणि १९७० मध्ये काउंटी चॅम्पियनशिपमधून त्यांनी या नव्या प्रवासाची सुरुवात केली. १९७३ मध्ये इंग्लंडझ्रन्यूझीलंड टेस्टमधून त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढील दोन दशकांत ते जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांना आदरणीय अंपायर ठरले.