७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ््यात मंगळवारी गौरविणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ ने सन्मानित केले जाणार आहे. चित्रपटसृष्टीतील आजवरच्या योगदानासाठी मोहनलाल यांना शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी हा पुरस्कार जाहीर झाला. प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारे मोहनलाल हे दुसरे मल्याळी कलाकार आहेत. त्यांच्याआधी अदूर गोपालकृष्णन यांना २००४ साली हा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कारासाठी निवड होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
मोहनलाल यांच्या आधी ज्येष्ठ बॉलिवूड आणि बंगाली अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना हा पुरस्कार मिळाला होता. २०२२ च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने मिथून यांना सन्मानित करण्यात आले. ६५ वर्षीय मोहनलाल हे गेल्या ४५ वर्षांपासून मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत. १९८० साली त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. ४५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी त्यांना या आधी पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मोहनलाल यांना येत्या २३ सप्टेंबर २०२५ रोजी होणा-या ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ््यात दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
४०० हून अधिक चित्रपटात काम
मोहनलाल यांच्या चित्रपट प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अभिनयासह दिग्दर्शन आणि प्रोडक्शनदेखील केले आहे. त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. मल्याळमच नाही तर तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले. त्यांना आतापर्यंत पाच राष्ट्रीय पुरस्कार, ९ केरळ स्टेट फिल्म अवॉर्डस मिळालेले आहेत. भारत सरकारने त्यांच्या कारकीर्दीचा गौरव म्हणून त्यांचा पद्मभूषण आणि पद्मश्रीने गौरव केला आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार
दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली राजा हरिश्चंद्र या भारतातील पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला. १९६९ मध्ये देविका राणी यांना पहिल्यांदा या पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित होणारे हे चित्रकर्मी, भारतीय सिनेमाची निर्मिती आणि विकासात त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानासाठी ओळखले जातात. सुवर्णकमळ पदक, शाल आणि १० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.