नाव, निवडणूक चिन्हही प्रदर्शित करणार, मतदारांचा गोंधळ टळण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिहार मतदार यादी सुधारणांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने बुधवार, दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी मोठा निर्णय घेतला. ईव्हीएममध्ये आता उमेदवारांचे रंगीत छायाचित्र, त्यांची नावे आणि निवडणूक चिन्हांसह प्रदर्शित केले जाईल. याची सुरुवात बिहार विधानसभा निवडणुकीपासून होणार आहे. मतदारांचा गोंधळ होऊ नये आणि उमेदवार स्पष्टपणे दिसावा, जेणेकरून योग्य उमेदवाराला मतदान करता येईल, यासाठी निवडणूक आयोगाने पुढचे पाऊल टाकल्याचे समजते. विरोधकांनी निवडणूक आयोगाला आरोपाच्या घे-यात घेतल्यानंतर नवनवीन सुधारणा करण्यात येत आहेत.
निवडणूक आयोगाच्या मते, समान नावे असलेले उमेदवार मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करतात. म्हणून कोणताही गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांचे रंगीत छायाचित्रे ईव्हीएमवर लावले जाणार आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये छायाचित्रे स्क्रीनच्या तीन चतुर्थांश भागावर छापली जातील, ज्यामुळे प्रतिमा स्पष्टपणे दिसून येईल. उमेदवारांची नावे एकसमान फॉन्टमध्ये असतील, असे स्पष्ट करण्यात आले. हा उपक्रम निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि मतदारांची सोय वाढविण्यासाठी गेल्या ६ महिन्यांत राबविण्यात आलेल्या २८ उपाययोजनांचा एक भाग आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने उमेदवारांचे अनुक्रमांक आणि नोटा पर्याय अधिक ठळकपणे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवार/नोटा नावे एकसमान फॉन्टमध्ये आणि सहज वाचण्यासाठी मोठ्या आकारात असतील. यासोबतच निवडणूक आयोग लवकरच संपूर्ण भारतात विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) साठी तारीख निश्चित करेल आणि राज्यांमध्ये मतदार याद्यांची पुनरावलोकन प्रक्रिया वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे.
