ढाका : वृत्तसंस्था
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने ढाका येथील एका स्टेट बँकेची दीर्घकाळ बंद असलेली तिजोरी उघडण्याचे आदेश दिले आहेत. ही तिजोरी ११७ वर्षांपूर्वी (१९०८ मध्ये) सील करण्यात आली होती. जगातील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक असलेला दर्या-ए-नूर हिरा या तिजोरीत बंद असण्याची शक्यता आहे. या हि-याला कोहिनूरची बहीण म्हटले जाते, जो सध्या ब्रिटनमध्ये आहे. दोन्ही हिरे भारतातून घेतले गेले होते. सध्या या हि-याची किंमत सुमारे १३ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ११४.५ कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे.
भारताच्या गोवळकोंडाच्या खाणीत सापडलेला दर्या-ए-नूर ज्याचा अर्थ सौंदर्याची नदी असा होतो. हा २६ कॅरेटचा हिरा आहे, जो त्याच्या आयताकृती, सपाट पृष्ठभागासाठी (टेबल-कट) ओळखला जातो. बांगलादेश वृत्तपत्र द बिझनेस स्टँडर्डनुसार हा हिरा दक्षिण भारतातील खाणींमधून काढला गेला होता. जिथून जगप्रसिद्ध कोहिनूर हिरादेखील सापडला होता. हा हिरा सोन्याच्या ब्रेसलेटच्या (बाहुल्याच्या) मध्यभागी जडलेला आहे, जो दहा लहान हि-यांनी वेढलेला आहे (प्रत्येकी सुमारे ५ कॅरेट). या हि-याचे वैशिष्ट्य केवळ त्याचे सौंदर्यच नाही तर त्याचे ऐतिहासिक महत्त्वही आहे. हा हिरा मराठा राजे, मुघल सम्राट आणि भारतातील शीख शासकांच्या मालकीचा होता. ब्रिटिश राजवटीत तो अनेक हातांमधून गेला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो बांगलादेशच्या सोनाली बँकेच्या तिजोरीत असण्याची शक्यता आहे, जी कदाचित १९०८ पासून येथे बंद आहे. द बिझनेस स्टँडर्डनुसार तिजोरी शेवटची १९८५ मध्ये उघडण्यात आली होती आणि तेव्हाच हि-याची पुष्टी झाली होती. परंतु २०१७ मध्ये, हिरा गायब झाल्याचे वृत्त आले. ढाक्याचे नवाब सलीमुल्लाह यांचे पणतू ख्वाजा नईम मुराद यांनी ही दंतकथा नाही. हा हिरा आयताकृती आहे आणि त्याच्याभोवती अनेक लहान हिरे आहेत. त्यांच्या मते, हा हिरा सोन्या-चांदीची तलवार, हि-याने जडलेली फेज (टोपी) आणि फ्रेंच राणीचा तारा ब्रोच यासह १०८ इतर खजिन्यांसह तिजोरीत ठेवण्यात आला होता. हा हिरा १९४७ मध्ये भारताच्या फाळणीदरम्यान किंवा १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात हरवला असावा. नंतर तो बांगलादेशात पोहोचला असावा. याच नावाचा हिरा सध्या इराणची राजधानी तेहरानमध्ये ठेवण्यात आला आहे. त्याचा रंग हलका गुलाबी आहे, तो बांगलादेशच्या दर्या-ए-नूरपेक्षा वेगळा आहे.