शब्दांमध्ये फेरफार, सरकारकडून फसवणूक!

yongistan
By - YNG ONLINE


मुंबई : प्रतिनिधी

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यातील सदस्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांसंबंधी काही मागण्या तात्काळ मान्य करत जीआर सुपूर्द केला. जरांगे पाटील यांनी तुमच्यामुळे जिंकलो, असे जाहीर केले. त्यानंतर आझाद मैदान परिसरात जल्लोष साजरा केला. पण तेथे असलेल्या वकील योगेश केदार यांनी जीआरवर आक्षेप घेत सरकारने फसवले आहे, अशी भूमिका घेतली. त्यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म फेसबूकवर व्हिडिओ पोस्ट करत जीआरसंबंधी भूमिका मांडली. परंतु मी सत्य सांगत असताना ऐनवेळी मला बाजूला सारल्याचा दावा आक्रमक आंदोलक अ‍ॅड. योगेश केदार यांनी केला.  

मनोजदादांसारख्या प्रामाणिक नेतृत्वाने मला तो जीआर तपासून घेण्याची जबाबदारी दिली होती. याच्यात काही उणिवा असतील तर सांगा. तिथेच आम्ही तपासले. त्यावेळी जीआरमधील शब्दांत ब-यापैकी फेरफार केला गेलेला दिसून आला. त्यात संभ्रम ठेवला गेला. जेणेकरून येणा-या हजारो मराठ्यांना, अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे. मनोजदादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांची दिशाभूल केली. माझे असे स्पष्ट म्हणणे आहे की, सरकारने आपल्याला फसवले आहे, असे अ‍ॅड. योगेश केदार यांनी सांगितले. 

मनोजदादांनी आजही संयम बाळगावा, आम्ही त्यांच्या नेतृत्त्वात लढण्यास आजही तयार आहोत. ते आमच्यासाठी दैवत आहेत. पण हा जीआर वाचला तर आपल्याला त्यातील अनेक उणिवा लक्षात येतील. या जीआरचा कोणाला लाभ होऊ शकतो. ज्यांच्या नोंदी कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा असतील, अशा लोकांना त्याचा लाभ होईल. मग यात वेगळे काय आहे. शिंदे समितीने ते आधीच शोधले आहे. अजून सोप्या भाषेत सांगतो. ज्या-ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत, त्यांनाच याचा फायदा होणार आहे, असेही केदार यांनी म्हटले आहे.


सत्य सांगत असताना 

मला दूर करण्यात आले

ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडली नाही. त्यांना याचा काही लाभ होणार नाही. आम्ही असे समजत होतो की, हैदराबाद गॅझेटियर लागू करणे म्हणजे तेथील सर्व मराठा कुणबी आहेत किंवा कुणबी मराठा आहेत. पण अशी त्यात कुठेही स्पष्टता नाही. हैदराबाद गॅझेटियरच्याबाबतीत अनेक कायदे तज्ज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे. या जीआरलाही आव्हान देता येईल. यातून मराठांच्या पदरात काही मिळालेले नाही. दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्याजवळच्या लोकांनी मला दूर केले, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.