अनुकंपा तत्त्वावरील १० हजार जागा भरणार

yongistan
By - YNG ONLINE


 -राज्य सरकारचा निर्णय, चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना मोठा दिलासा

मुंबई : प्रतिनिधी 

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील चतुर्थ श्रेणीतील तब्बल १० हजार जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना गणपती बाप्पा पावला आहे.

राज्यातील शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये काम करताना एखाद्या कर्मचा-याचे निधन झाले तर कुटुंबातील वारसाला त्या विभागात नोकरी देण्याची तरतूद अनुकंपा तत्त्वावर आहे. अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे धोरण १९७३ पासून आहे; पण गेल्या अनेक वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील नोकरभरती झालेली नव्हती. सरकारी कर्मचारी संघटनांनी या भरतीसाठी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीपत्र सादर केले होते. अखेर या पाठपुराव्याला यश आले.

राज्यात चतुर्थ श्रेणीच्या सुमारे ९ हजार ६५८ जागा रिक्त आहेत. या सर्व जागा पुढील काही दिवसांत भरल्या जाणार आहेत. अलिकडच्या काळातही ही सर्वात मोठी भरती आहे. जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १५ तारखेपासून भरतीला सुरवात होईल, असे सांगण्यात आले.

निम्मी भरती महापालिकेत

अनुकंपा तत्त्वावरील सुमारे ५ हजार २२८ पदे महापलिकांमधील आहेत. जिल्हा परिषदांमध्ये ३ हजार ७०५, नगरपालिकांमधील ७२५ पदे आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ५०६ उमेदवार आहेत. पुण्यात ३४८, गडचिरोलीत ३२२ व नागपूरमध्ये ३२० पदे भरण्यात येणार आहेत.

७ हजार लिपिकांची भरती

लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ७ हजार लिपिकांचीही भरती करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. या भरतीत पंचायतराज, जिल्हा परिषदा, महानगर पालिका ग्रामीण विकास व शहरी विकास संस्थासह विविध विभागांचा समावेश आहे.