पाकला लोळवले, तिलक वर्मा विजयाचा हिरो
दुबई : वृत्तसंस्था
भारतीय संघाने रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर ५ विकेटस्ने दणदणीत विजय मिळवित आशिया चषक आपल्या नावे केला. तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. रिंकू सिंहने विजयी चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली यंग इंडियाने एकही सामना न गमावता आशिया चषकावर आपले नाव कोरले. भारताने सलग तिस-यांदा आणि आतापर्यंत तब्बल नवव्यांदा आशिया चषक जिंकून नवा विक्रम प्रस्थापित केला.
भारताने सुरुवातीला पाकिस्तानला १४६ धावांत रोखले. त्यानंतर भारतीय संघ विजयासाठी १४७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र, आशिया कपमध्ये आतापर्यंत शानदार फलंदाजी करणारा अभिषेक शर्मा दुस-या षटकात ५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माचा शो सर्वांना पाहायला मिळाला. तिलक वर्माने प्रथम संजू सॅमसनसोबत आणि त्यानंतर शिवम दुबेसोबत जोरदार फटकेबाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
१४७ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारतीय संघाने अवघ्या २० धावांत आघाडीच्या तीन विकेट गमावल्या होत्या. दुस-या ओव्हरमध्ये आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा आऊट झाला. फहीम अशरफने त्याला आऊट केले. त्यानंतर शुभमन गिलने १० चेंडूत १२ धावा केल्या. कप्तान सूर्यकुमार यादव या सामन्यातही फ्लॉप राहिला. ५ चेंडूत १ धाव करून आऊट झाला. यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकीय भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र १३ व्या ओव्हरमध्ये अबरारने संजू सॅमसन (२४) ला आऊट केले. यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी पुन्हा एक अर्धशतकीय भागीदारी केली. एक टप्प्यावर भारताला जिंकण्यासाठी २ ओव्हरमध्ये १७ धावा लागत होत्या. अंतिम ओव्हरमध्ये १० धावा हव्या होत्या. तिलक वर्माने फटकेबाजी करून विजय समिप आणला. शेवटी १ धावेची गरज असताना रिंकू सिंगने विजयी चौकार मारत सामना जिंकला. या सामन्यात भारतासाठी तिलक वर्माने ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या आणि तो भारताच्या विजयाचा शिलेदार ठरला.
कुलदीपचा चौकार
कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी करत पाकिस्तानची कंबर मोडली. त्याने ४ षटकांत ३० धावा देत ४ गडी बाद केले. कुलदीप यादवसह अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.