कट ऑफ घसरला, ईडब्ल्यूएस प्रवर्गाला होणार फायदा?

yongistan
By - YNG ONLINE


मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील सर्वात मोठा समाज असलेल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी मागणी करत उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मोठे आंदोलन केले. त्यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा जीआर जारी करत विविध मागण्या मान्य केल्या. त्यामुळे कुणबीचा पुरावा देणा-या मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यातच मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून १० टक्के आरक्षणही मिळाले आहे. त्यामुळे मराठा समाज ईडब्ल्यूएसमधून बाहेर पडला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेत ईडब्ल्यूएसचेच कट ऑफ सगळ््यात खाली आले आहे. त्यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील युवकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून १० टक्के आरक्षण दिलेले आहे. त्यामुळे मराठा समाजासमोर दोन पर्याय खुले झाले असून ईडब्ल्यूएस कोट्यातील आरक्षण आपोआप रद्द झाले. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी मुख्य परीक्षेच्या निकालातून समोर आलेली आकडेवारी विचार करायला भाग पाडणारी आहे. कारण स्पर्धेच्या युगात सगळ््यात कमी कट ऑफ ईडब्ल्यूएसचे आले आहे. त्यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थी, युवकांना चांगलाच फायदा होणार आहे. एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गाचे मेरीट ५०७ गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून एसईबीसी म्हणजेच मराठा समाजाच्या उमेदवारांसाठीची मेरीट ४९०.७५ एवढे आहे. 

मराठा उमेदवारांना आता एसईबीसी किंवा पात्र असल्यास ओबीसी असे दोनच प्रवर्ग उपलब्ध आहेत. मराठा उमेदवार ईडब्ल्यूएस कोट्यातून बाहेर पडल्याने येत्या काळात सरळसेवा पदभरतीत ईडब्ल्यूएसचा कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात ईडब्ल्यूएस प्रवर्गात असणा-या उमेदवारांना सुगीचे दिवस येणार आहेत. कारण कट ऑफ कमी असल्याने कमी गुणांवरही निवड होऊ शकते, हे नुकतेच जाहीर झालेल्या निकालातून समोर आले आहे. त्यामुळे ओपन कॅटेगिरीतील तरुणांनी संधी सोडू नये. कारण यापुढे ओबीसी प्रवर्गातच विद्यार्थ्यांमध्ये नोकरीसाठी प्रचंड स्पर्धा पाहायला मिळू शकते. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेला निकालाचा आकडा नक्कीच आरक्षण प्रवर्गाचा आणि ईडब्लूएस आरक्षणाच्या मेरीटचा विचार करायला लावणारा आहे.

एमपीएससीतील

जातनिहाय मेरिट

ओपन : ५०७.५० 

एसईबीसी : ४९०.७५ 

ओबीसी : ४८५.५० 

एससी : ४४५. ७५

ईडब्ल्यूएस : ४४५.००

मराठा समाज ईडब्लूएसमधून बाहेर

सरकारने मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्याने ते ईडब्ल्यूएसमधून आधीच बाहेर पडले आहेत. त्यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गात सध्या असणारी लोकसंख्या आणि जातींचा विचार करता त्यांना स्पर्धा कमी असेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळवून बहुसंख्य मराठा-कुणबी उमेदवार ओबीसीमध्ये गेल्याने ओबीसी प्रवर्गात स्पर्धा वाढली आहे. आगामी काळात अनेक मराठा तरुण, समाजातील नागरिक ओबीसीमध्ये जाणार आहेत. त्यामुळे ओबीसीमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होऊ शकते. कदाचित ओपन प्रवर्गापेक्षा ओबीसीचे मेरीट अधिक लागण्याची शक्यता आहे. एससी, एसटी, व्हीजेएनटी प्रवर्गात आहे तशीच स्पर्धा असण्याची शक्यता आहे.