ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे निधन

yongistan
By - YNG ONLINE

 


लातूर : प्रतिनिधी 

आभाळ फाटल्याने कधीही न पाहिलेल्या महापुराने अवघ्या मराठवाड्याचा लाल चिखल झाला असतानाच शाळेच्या धड्यातून काळीज चिरणारे मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्रा. भास्कर चंदनशिव यांचे रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ग्रामीण साहित्य क्षेत्रात आगळीवेगळी ओळख निर्माण करणारा ज्येष्ठ साहित्यिक हरपल्याने साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

भास्कर चंदनशिव यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी कमलाबाई, मुलगा कपिल, मुलगी मनिषा, दोन सुना, नाती, नातू, जावई, असा मोठा परिवार आहे. भास्कर चंदनशिव हे मराठवाडा साहित्य परिषदेच्या २०११ च्या एप्रिलमध्ये केज (जि. बीड) येथे झालेल्या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २०१२ मध्ये पळसप (जि. धाराशिव) येथे झालेल्या एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.

भास्कर चंदनशिव हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४५ रोजी हासेगाव (ता. कळंब) येथे झाला. त्यांचे मूळ नाव भास्कर देवराव यादव होते. दत्तकपुत्र असल्याने भास्कर तात्याबा चंदनशिव म्हणून त्यांची ओळख झाली. शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा कळंबमध्ये झाले. अंबाजोगाईत बीए पूर्ण केले. छत्रपती संभाजीनगरला मराठी विषयातून एम. ए. केले. जून १९७२ मध्ये वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरीस प्रारंभ केला. त्यांनी वैजापूर येथे नोकरी केली. बलभीम महाविद्यालय बीड येथून २००५ मध्ये ते सेवानिवृत्त झाल्यानंतर कळंबला स्थायिक झाले.

वयाच्या विसाव्या वर्षी भास्कर चंदनशिव यांनी कथालेखनास प्रारंभ केला. त्यांच्या साहित्यकृतीत सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांच्या समोर येतो. चंदनशिव यांच्या ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘बिरडं’, ‘नवी वारुळं’ या कथासंग्रहांचा आवर्जून उल्लेख केला जातो. 


साहित्यसंपदा

कथासंग्रह  : जांभळढव्ह (१९८०), मरणकळा (१९८३), अंगारमाती (१९९१), नवी वारुळ (१९९२), बिरडं (१९९९) 

-ललितलेख संग्रह : रानसई 

-समीक्षा ग्रंथ : भूमी आणि भूमिका, माती आणि नाती, माती आणि मंथन 

संपादन : ज्योती म्हणे, गाथा, सगनभाऊंच्या लावण्या इत्यादी