भारताची व्यापारी तूट २.५ लाख कोटींवर

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सप्टेंबर महिन्यात देशाची व्यापार तूट १३ हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे भारताची व्यापारी तूट २८.० अब्ज डॉलर्सपर्यंत म्हणजेच २.४८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा धोका वाढला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातून निर्यात किंवा विक्री वाढण्यापेक्षा आयातीवर खर्च वाढत आहे. त्यामुळे व्यापार तूट वाढू लागली असून, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा आहे.
ऑगस्टमधील २६.५ अब्ज डॉलर्स (२.३५ लाख कोटी) पेक्षा हा आकडा १.५ अब्ज डॉलर्सने जास्त आहे. या लक्षणीय वाढीचे सर्वांत मोठे कारण म्हणजे देशात सोन्याच्या आयातीत झालेली वाढ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सप्टेंबरमध्ये किमतीत वाढ होऊनही सोन्याची आयात जवळजवळ दुप्पट झाली. या वर्षी सोन्याच्या किमती ४५,३६३ रुपयांनी वाढल्या आहेत. परंतु लोकांनी त्यांची खरेदी कमी केलेली नाही. सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात ऑगस्टच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. या मागणीमागील मुख्य कारण सणासुदीचा काळ आणि लग्नसराईचा काळ भारतीय बाजारपेठेत सोन्याची खरदे वाढते. 
सोन्याच्या आयाती व्यतिरिक्त भारताची निर्यातही मंदावली आहे. याचे मुख्य कारण जागतिक मागणीत घट आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात झालेला विलंब आहे. भारताच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे २० टक्के वस्तू अमेरिका खरेदी करते. अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापारातील मंदीचा थेट परिणाम भारतीय निर्यातीवर झाला आहे. तथापि, वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पुष्टी केली आहे की, अमेरिकेसोबत पहिल्या टप्प्यातील व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू आहेत, जो नोव्हेंबर २०२५ पर्यंत चर्चा सुरू राहण्याची अपेक्षा आहे. जर हा करार झाला तर शुल्क कमी केल्याने अमेरिकेतील निर्यात वाढू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.