चषक परत द्या, बीसीसीआयचा नक्वी यांना इशारा
मुंबई : प्रतिनिधी
आशिया चषक स्पर्धा २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ५ गडी राखून विजय मिळविला. परंतु पाकिस्तानचे मंत्री आशियाई क्रिकेट परिषदेचे (एससीसी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास टीम इंडियाने नकार दिला. ही ट्रॉफी भारतीय संघाला न देता नक्वी ट्रॉफी आणि मेडल्स स्वत:कडे घेऊन गेले. या वादामुळे भारतीय संघाला अद्याप जेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही. यावरून आज एसीसीच्या बैठकीत बीसीसीआय आणि नक्वी यांच्यात तुफान राडा झाल्याचे सांगितले जात आहे.
बीसीसीआयने आज झालेल्या बैठकीत मोहसीन नक्वी यांच्याकडे विजेतेपदाची ट्रॉफी आणि विजेत्यांची पदके भारतात परत देण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयात पाठवण्याची मागणी केली. मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी दुबई येथे झालेल्या एसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच नक्वी यांच्या आडमुठ्या वर्तणुकीबाबत नोव्हेंबरमध्ये होणा-या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआय नक्वीविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्याची योजना आखत आहे.
ट्रॉफी आणि पदके
नक्वींच्याच ताब्यात
आशिया कपनंतर भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर रागाच्या भरात मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी आणि सर्व पदके सोबत नेले. आशिया कप ट्रॉफी आणि खेळाडूंची वैयक्तिक पदके अजूनही दुबईतील मोहसीन नक्वी यांच्या हॉटेल रुममध्येच ठेवण्यात आली आहेत. बीसीसीआयने आशिया कप ट्रॉफी दुबई स्पोर्टस सिटीमधील एसीसीच्या कार्यालयात पाठविण्यास सांगितले. परंतु अजूनही नक्वी आपल्या मतावर अडून बसलेले आहेत.