दरवर्षी ४० टक्के अन्न वाया, ९२ हजार कोटी रुपयांचे नुकसान
हंगर इंडेक्समध्ये भारताचा १०१ वा क्रमांक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतासारख्या प्रचंड आणि विविधतेने नटलेल्या देशात एका बाजूला मॉल्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस्मध्ये रोज कित्येक टन अन्न वाया जाते. दुस-या बाजूला कोट्यवधी भारतीय अजूनही रात्री उपाशीपोटी झोपतात. आपण ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना कोट्यवधी नागरिक उपाशी झोपतात ही शोकांतिका आहे. ज्या देशात अन्नाची मुबलकता आहे, तिथेच उपासमारी आहे, हे वास्तव आहे. भारतात रोज तब्बल १९ कोटी लोक उपाशी झोपतात. ही चिंतेची बाब आहे.
दरवर्षी १६ ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संस्थामार्फत १९४५ मध्ये या दिवसाची सुरुवात झाली होती. यंदा एफएओला ८० वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर उपासमार, अन्न वाया जाणे आणि कुपोषण या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले जात आहे.
भारतात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३, मिड डे मिल योजना, अंगणवाडी कार्यक्रम आणि सार्वजनिक वितरण प्रणाली या योजनांच्या माध्यमातून उपासमार कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही अन्नवाटपातील असमानता, साठवणूक व्यवस्थेतील त्रुटी आणि अन्न वाया जाण्याची प्रवृत्ती या कारणांमुळे लाखो लोकांना भुकेची समस्या भेडसावत आहे.
भारतातील उपासमारीचे चित्र
ताज्या अहवालानुसार भारतामध्ये रोज १९ कोटींपेक्षा जास्त लोक उपाशी झोपतात. ही संख्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. दरवर्षी जवळपास ४० टक्के अन्न वाया जाते, ज्याची आर्थिक किंमत तब्बल ९२ हजार कोटी रुपये आहे.
२०२१ च्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक ११६ देशांपैकी १०१ वा होता. म्हणजेच भारतात उपासमारीची समस्या गंभीर पातळीवर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक उपाशी लोक भारतात आहेत. ही संख्या चीनपेक्षाही जास्त आहे.
दरवर्षी जगभरात २५००
दशलक्ष टन अन्न वाया
जगभरात दरवर्षी तब्बल २,५०० दशलक्ष टन अन्न वाया जाते. केवळ कोरोना काळाच्या आधी ९३० दशलक्ष टन अन्न खराब झाले होते. यात ६३ टक्के अन्न घरांमधून, २३ टक्के रेस्टॉरंटमधून आणि १३ टक्के रिटेल दुकानदारांकडून वाया गेले. त्याचसोबत आर्थिक पातळीवरील असमतोलता हे सर्वात मोठे कारण आहे.