महाकेअर फाऊंडेशनची स्थापना, डे केअर केंद्रांची संख्या वाढविणार
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले असून त्यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन अर्थात महाकेअर फाऊंडेशन कंपनी स्थापन करण्याचा निर्णय मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे राज्यभरातील १८ रुग्णालयांत विशेषोपचार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातून कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचाराची सोय होणार आहे.
कर्करोगग्रस्त रुग्णांना दर्जेदार उपचाराची सोय व्हावी, यासाठी राज्यात कर्करोगाशी संबंधित डे-केअर केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. या धोरणानुसार कर्करोग रुग्णालयांची एल १, एल २ आणि एल ३ अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून रेडिओथेरपी, किमोथेरपी तसेच पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार शिक्षण, सर्व प्रकारच्या कर्करोगांचे निदान, शस्त्रक्रिया, भौतिकोपचार, मानसिक आधार आणि उपचार, संशोधन यांसह पॅलेटिव्ह उपचार, औषध सुविधा यांची उपलब्धता तसेच जनजागृतीचे उपक्रम राबविले जाणार आहेत.
यात टाटा स्मारक रुग्णालय ही संस्था एल १ स्तरावरील शिखर संस्था म्हणून निश्चित करण्यात आली आहे एल-२ स्तरावर ८ केंद्रे निश्चित केली आहेत, ज्यात छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, मुंबईतील जे. जे. रुग्णालय, कोल्हापूर, पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज तसेच नाशिक आणि अमरावतीतील सार्वजनिक आरोग्य विभागाची संदर्भ रुग्णालये यांचा समावेश आहे. एल ३ स्तरावर अंबाजोगाई, नांदेड, यवतमाळ, सातारा, बारामती, जळगाव, रत्नागिरी, मुंबईतील कामा-अल्ब्लेस रुग्णालय आणि शिर्डी संस्थानचे रुग्णालय अशा ९ रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.
महाकेअर फाऊंडेशनला सुरुवातीला १०० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. याशिवाय फाऊंडेशन क्लिनिकल ट्रायल्समधून निधीची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच या फाऊंडेशनला आवश्यकतेनुसार आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत तसेच देणग्या, अनुदाने, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत निधी उभारता येणार आहे. यामुळे फाऊंडेशनला कर्करोगाव्यतिरिक्त वैद्यकीय शिक्षण आणि औषधीद्रव्ये विभागांतर्गत इतर प्रकल्पांसाठीदेखील निधी उभा करता येणार आहे.
महाकेअर फाऊंडेशनला
१०० कोटींचा निधी देणार
महाकेअर फाऊंडेशनला भागभांडवल म्हणून सुरुवातीला १०० कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कर्करोग रुग्णालयांना मिळणा-या शुल्कापैकी २० टक्के शुल्क महाकेअर फाऊंडेशनला देण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
