लातूर : माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी राज्यपाल, लातूरचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांचे १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुत्र शैलेश पाटील चाकूरकर, स्नुषा अर्चनाताई पाटील चाकूरकर, दोन नाती असा परिवार आहे.
लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे राज्यपाल अशी शिवराज पाटील चाकूरकर यांची राजकीय कारकीर्द राहिलेली आहे. लातूरचे नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर ते राज्याच्या राजकारणात आमदार, विधानसभा उपाध्यक्ष, विधानसभा अध्यक्षपदापर्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर केंद्रीय राजकारणात विविध मंत्रिपदाची धुरा सांभाळताना लोकसभा उपसभापती, सभापती आणि ते थेट केंद्रीय गृहमंत्री आणि नंतरच्या काळात पंजाबचे राज्यपाल अशा विविध प्रमुख पदांवर आपल्या आगळ््यावेगळ््या कार्यशैलीतून तब्बल ६ दशके राजकीय पटलावर वेगळी छाप सोडणारे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांची वयाच्या ९१ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने राजकारणातील निष्कलंक व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा शैलेश पाटील चाकूरकर, स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर व दोन नाती असा परिवार आहे.
लातूरचे नगराध्यक्ष, आमदार, खासदार, केंद्रीयमंत्री, राज्यपाल असा १९६७ पासून २००४ पर्यंत राजकीय प्रवास करत असताना त्यांनी कधीही पराभव पाहिला नाही. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी कधीही निवडणुकीत सहभाग घेतला नाही. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध विषयांचा सखोल अभ्यास, मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व हे त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य राहिलेले आहे. चाकूरकर यांच्या निधनाने एक अभ्यासू, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हरपल्याने लातूरची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजता बोरवटी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शिवराज पाटील चाकूरकर हे उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली. त्यानंतर लातूरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. १९७२ आणि ७८ मध्ये लातूरचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केले. १९८० मध्ये ते लातूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग सातवेळा त्यांनी लातूरचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर ते राज्यसभेचेही खासदार झाले आणि त्यांच्यावर केंद्रीय गृहमंत्रिपदाची धुरा सोपविली गेली. त्यानंतर पंजाबचे राज्यपाल म्हणूनही आपली कारकीर्द गाजवली. अशा या अनुभवसंपन्न राजकारणी शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज निधन झाले.
राजकारणातील निष्कलंक नेतृत्व काळाच्या पडद्याआड
जन्म - 12 ऑक्टोबर 1935
मृत्यू - 12 डिसेंबर 2025
- राजकीय कारकीर्द -
नगराध्यक्ष लातूर - 1 ऑगस्ट 1966 ते 31 मार्च 1970
आमदार लातूर - 1972 ते 1980
विधानसभा उपाध्यक्ष - 5 जुलै 1977 ते 2 मार्च 1978
विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र - 17 मार्च 1978 ते 6 डिसेंबर 1979
लोकसभा सदस्य, लातूर - 1980 ते 2004
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री - 1980 ते 1982
केंद्रीय वाणिज्य मंत्री - 1982 ते 1983
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री - 1983 ते 1984
लोकसभा उपसभापती - 19 मार्च 1990 ते 13 मार्च 1991
लोकसभा सभापती - 10 जुलै 1991 ते 22 मे 1996
केंद्रीय गृहमंत्री - 22 मे 2004 ते 30 नोव्हेंबर 2008
राज्यसभा सदस्य - 5 जुलै 2004 ते 22 जानेवारी 2010
पंजाब राज्यपाल - 22 जानेवारी 2010 ते 21 जानेवारी 2015
