जि. प. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल
मुंबई : प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या नियमांत राज्याच्या ग्रामविकास खात्याने एक महत्त्वपूर्ण बदल केला. यापुढे ईव्हीएम बॅलेट मशीनवर पहिला राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर प्रादेशिक पक्ष मग अपक्ष उमेदवार असा क्रम असणार आहे. या क्रमानेच उमेदवारांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ग्रामविकास खात्याने त्यासंबंधी दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी जीआर प्रसिद्ध केला आहे.
या आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आडनावाच्या अद्याक्षरानुसार क्रमवार नावे असायची. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या आणि राज्य प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांची नावे खाली जायची. आता नव्या गॅझेटनुसार राष्ट्रीय पक्षाच्या आणि प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांची नावे सर्वात वर असतील, असा निवडणूक नियम बदलला आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामीण विकास विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. हे नियम तातडीने लागू करण्यात आल्याने आगामी पंचायत समिती निवडणुकांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
उमेदवारांचे ४ गट निश्चित
मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार, इतर राज्यांतील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार, राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पण अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार, अपक्ष उमेदवार असे उमेदवारांचे ४ गट तयार करण्यात येत असून, या वर्गीकरणामुळे मोठ्या पक्षांपासून अपक्ष उमेदवारांपर्यंत सर्वांची स्पष्ट ओळख निर्माण होणार आहे, असे सांगण्यात आले.
