पुरुष क्रिकेटपटूंसारखीच मिळणार मॅच फी
मुंबई : प्रतिनिधी
बीसीसीआयने वूमन्स क्रिकेटसाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणा-या महिला खेळाडूंसाठी पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनाही समसमान मॅच फी मिळणार आहे. बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याने आता मेन्स आणि वूमन्स खेळाडूंची मॅच फी समसमान झाली. यासंबंधीची घोषणा सोमवार, दि. २२ डिसेंबर रोजी करण्यात आली.
बीसीसीआयने महिला क्रिकेटपटू आणि सामनाधिकारी यांच्या मॅच फीमध्ये तब्बल दुप्पटीपेक्षा जास्त वाढ केली आहे. त्यानुसार आता वनडे आणि मल्टी डे मॅचेससाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये असलेल्या खेळाडूंना एका दिवसासाठी ५० हजार रुपये मिळणार आहेत तर राखीव खेळाडूंना २५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. एका टी-२० सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधील खेळाडूंना प्रत्येकी २५ तर इतर खेळाडूंना १२.५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. याआधी प्लेइंग ईलेव्हनमधील खेळाडूंना २० तर इतर खेळाडूंना १० हजार रुपये मानधन देण्यात येत होते.
तसेच ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेतील महिला खेळाडूंनाही समसमान मानधन दिले जाणार आहे. त्यानुसार वनडे आणि मल्टी डे सामन्यांसाठी प्लेइंग ईलेव्हनमधील खेळाडूंना प्रतिदिन २५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे तर राखीव खेळाडूंना १२ हजार ५०० रुपये मिळणार आहेत तर टी-२० सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधील प्रत्येकीला १२.५ हजार तर इतर खेळाडूंना ६ हजार २५० इतके मानधन मिळणार आहे.
पंच आणि सामनाधिका-यांनाही फायदा
खेळाडूंसह पंच आणि सामनाधिका-यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. पंच आणि सामनाधिका-यांना देशांतर्गत स्पर्धेतील साखळी फेरीतील क्रिकेट सामन्यासाठी प्रतिदिन ४० तर बाद फेरीतील सामन्यासाठी ५०-६० हजार रुपये मिळणार आहेत. तसेच या वाढीनुसार रणजी ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील एका सामन्यासाठी १ लाख ६० हजार तर बाद फेरीतील सामन्यासाठी अडीच ते ३ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
