न्यूझीलंडचे मार्केट भारतासाठी खुले

yongistan
By - YNG ONLINE



दोन देशांत मुक्त व्यापार करारातील वाटाघाटी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

न्यूझीलंड आणि भारताचे अनेक वर्षांचे चांगले संबंध आहेत. त्यामध्ये भारतावर अमेरिकेने निर्बंध लादलेले असतानाच न्यूझीलंड भारतासाठी मैदानात आला. न्यूझीलंडने त्यांचे मार्केट भारतासाठी खुले केले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करारावरील वाटाघाटी मार्च २०२५ मध्ये सुरू झाल्या. पंतप्रधान लक्सन यांनी भारताला भेट दिल्यानंतर याबाबत वाटाघाटी सुरू झाल्या. आता या करारावर शिक्कामोर्तब झाले आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्क्यांपेक्षा जास्त टॅरिफ लावला. ट्रम्प सरकारच्या या कठोर निर्णयाचा भारताच्या निर्यातीवर परिणाम झाला. त्यामुळे भारताने इतर देशांसोबत मुक्त व्यापार करार करून निर्यातीला बळ देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

या करारानुसार न्यूझीलंड पुढील १५ वर्षांत भारतात २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करेल. या गुंतवणुकीमुळे कृषी, दुग्धव्यवसाय, शिक्षण, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स यांसारख्या क्षेत्रांत संधी निर्माण होतील. 

अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेने इतक्या मोठ्या प्रमाणात भारतावर टॅरिफ लावल्यानंतरही भारताचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. उलट भारतीय वस्तूंची अमेरिकेत मागणी वाढली. भारतावर लावलेल्या टॅरिफच्या माध्यमातून जगापुढे अमेरिकेची दुटप्पी भूमिका आली. मागील अनेक वर्षांमध्ये भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. मात्र, अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीनमधील संबंध चांगले सुधारले. भारताच्या बाजूने चीन उभा राहिला. भारत आणि चीनने यादरम्यान काही महत्वपूर्ण करार देखील केला. त्यामध्येच न्यूझीलंडही भूमिका घेतल्याचे बघायला मिळत आहे. 

न्यूझीलंडसोबत सातवा 

मुक्त व्यापार करार

या करारातील विशेष बाब म्हणजे न्यूझीलंडसोबतचा गेल्या काही वर्षांतील भारताचा सातवा मोठा मुक्त व्यापार करार आहे. ओमान, यूएई, यूके, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया आणि ईएफटीए देशांसोबत असेच करार केले आहेत.