राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान
मुंबई : प्रतिनिधी
विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी बिगुल वाजला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, लातूरसह राज्यातील २९ महानगरपालिकांची निवडणूक एकाच दिवशी १५ जानेवारीला होणार असून, लगेच दुस-या दिवशी म्हणजे १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत राज्यातील ३ कोटी ४८ लाख ७८ हजार मतदार २८६९ नगरसेवकांना निवडून देणार आहेत. महापालिका क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
कोरोनाचे संकट व ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा व नगरपंचायतीची निवडणूक घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह २९ महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
