चेह-यावर हसू, डोळ््यात अश्रू
वॉशिंग्टन : नेव्हर गिव्ह अप असे म्हणत अवघ्या जगाला दोन दशकांहून जास्त काळ वेड लावणा-या जॉन सीनाने अखेर रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी निवृत्ती जाहीर केली. यासंबंधीची घोषणा करताना त्याच्या चेह-यावर हसू आणि डोळ््यात अश्रू होते. वॉशिंग्टनमध्ये पार पडलेल्या सॅटर्डे नाईट मेन इव्हेंटमधील सामना हा जॉन सीनाच्या रेसलिंग कारकिर्दीचा अखेरचा सामना ठरला.
गेल्या वर्षी जुलै महिन्यातच जॉन सीनाने डब्ल्यूडब्ल्यूई विश्वातून निवृत्त होणार अशी घोषणा केली होती. तेव्हापासूनच जॉन सीनाची फेअरवेल सीरिज सुरु झाली. वर्षभरात अनेक देशांमध्ये सामने खेळल्यानंतर वॉशिंग्टन डीसीच्या कॅपिटन वन स्टेडियममध्ये जॉन सीनाची शेवटची मॅच झाली.रेसलिंग विश्वात जवळपास सगळेचं विश्वविक्रम मोडणारा, हॉलिवूडमध्येही अभिनयातून आपले कसब दाखवणारा ग्लोबल आयकॉन अशी जॉन सीनाची ओळख बनली. २३ वर्षांच्या कारकिर्दीत जॉन सीनाने २,३२० सामने खेळले. त्यापैकी एक हजार ८१८ सामने जिंकले.
कर्ट अँकलपासून अंडरटेकरपर्यंत, शॉन मायकलपासून ब्रॉक लेसन्सरपर्यंत, सीएम फंकपासून रँडी ऑर्टनपर्यंत, एवढेच नव्हे तर अलीकडच्या काळातील रेसलर्स असलेल्या रोमन रिंग्जपासून कोडी -होड्सपर्यंत थेट लढत देत जॉन सीनाने एकापाठोपाठ एक सामने जिंकले आणि विक्रमांच्या पाय-या चढल्या. विशेष म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूईमधून काही काळ ब्रेक घेतल्यानंतर सीना चित्रपटसृष्टीकडे वळला आणि तिथेही सुपरस्टार बनला.
जॉन सीनाचा विश्वविक्रम
-१७ वेळा वर्ल्ड चॅम्पियन्सशीप
-५ वेळा यू. एस. चॅम्पियन्सशीप
-४ वेळा टॅग टीम चॅम्पियन्सशीप
-२ वेळा रॉयल रम्बल विजेता
-१ वेळा इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियन्सशीप
