टोकियो ऑलिंपिक २०२० ला भारताने जिंकली ७ पदके

yongistan
By - YNG ONLINE

पॅरिस : वृत्तसंस्था
ऑलिम्पिक २०२४ फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होत आहे. २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या अगोदर २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यावेळी भारताने एकूण ७ मेडल्स जिंकले. भारताची ही ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. भारताने या ७ पदकांसह लंडन ऑलिम्पिकमधील ६ मेडल्सचा रेकॉर्ड ब्रेक केला होता.
भारताकडून २०२० च्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण १२६ खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये ७१ पुरुष आणि ५५ महिला खेळाडू होत्या. त्यावेळी भारताने पहिल्याच दिवशी इतिहास रचला. मीराबाई चानूने पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवले. भारताची ऑलिम्पिक स्पर्धेतील इतिहासातील पहिल्याच दिवशी मेडल पटकावण्याची ही पहिलीच वेळ होती.

लवलिना बोरगोहेन-पीव्ही सिंधूची कामगिरी
मीराबाई चानूने भारताला अप्रतिम सुरुवात करून दिली. भारतीय खेळाडूंनी हेच सातत्य कायम ठेवले. भारताला दुसरे मेडल बॉक्सिंगमध्ये मिळाले. लवलिना बोरगोहेनने भारताला कांस्य पदक मिळवून दिले. त्यानंतर बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनेही कांस्यपदक मिळवले. सिंधूसह ऑलिम्पिकमध्ये २ मेडल्स जिंकणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली. त्याआधी अशी कामगिरी कुस्तीपटू सुशील कुमारने केली होती. भारतीय महिला खेळाडूंनंतर पुरुषांनीही दम दाखवला. कुस्तीत भारताला २ पदके मिळाली. रवीकुमार दहिया आणि बजरंग पुनिया या दोघांनी अनुक्रमे सिल्व्हर आणि ब्राँझ मेडल पटकावले.

४ दशकांच्या प्रतिक्षेला ब्रेक
हॉकी टीम इंडियाने भारतीय चाहत्यांची तब्बल ४१ वर्षांची प्रतीक्षा संपवली. हॉकी टीमने कांस्य पदक मिळवले. टीम इंडियाने जर्मनीला अटीतटीच्या सामन्यात ५-४ ने पराभूत केले. टीम इंडियाने अखेरीस हॉकीमध्ये १९८० साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.

ऐतिहासिक शेवट
टीम इंडियाची टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुरुवात झाली. त्यापेक्षा कित्येक पट शेवट हा ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरला. नीरज चोप्राने ८७.५८ मीटर दूर भालाफेकीत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिला. नीरजला मिळालेल्या पदकामुळे टीम इंडियाच्या खात्यातील मेडल्सची संख्या ७ इतकी झाली. टीम इंडियाने यासह लंडन ऑलिम्पिकमधील ६ पदकांचा रेकॉर्ड ब्रेक केला. आता भारतीय चाहत्यांना पॅरिसमध्ये टोकियो ऑलिम्पिकचा रेकॉर्ड ब्रेक होण्याची प्रतीक्षा आहे.