१ कोटी ७ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे

yongistan
By - YNG ONLINE
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे रक्षाबंधन सणाच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यात या योजनेच्या पहिल्या २ हफ्त्यांची रक्कम ३ हजार रुपये जमा झाली आहे. सरकारने १४ ऑगस्ट पासून महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा करण्यास सुरुवात केली असून शनिवार, दि. १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळपर्यंत १ कोटी ७ लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. दरम्यान, बँकेत महिलांची गर्दी वाढल्याने बँक कर्मचा-यांचा ताण वाढला असून, यासंबंधी बँक कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. 
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला तुफान प्रतिसाद मिळत असून सत्ताधारी आणि विरोधकही योजनेच्या श्रेयावरून आमने-सामने आहेत. दुसरीकडे या योजनेचे २ महिन्यांचे ३ हजार रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्याने ज्या महिलांना अद्याप योजनेचे पैसे मिळाले नाहीत, त्या महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. तसेच बँकेत जाऊन आधार लिंकही पाहिली जात आहे. त्यामुळे बँकेत गर्दी होत आहे. त्यातून महिलांचा बँक कर्मचा-यांशी वादही होत आहे. तसेच महिलांची वाढती गर्दी लक्षात घेता बँक कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्­यांना पत्र लिहून बँकेत सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.